बदनाम पोपट शिंदे; श्रीमंत हसन अली!
हिंदुस्थानातील लोकशाहीचे विडंबन

हसन अली या माणसाने आपल्या देशाचा 50 हजार कोटी इतका कर चुकवला आहे. पोपट शिंदे या तेलमाफियाच्या विरोधात रान उठविणारे हसन अलीच्या बाबतीत गप्प आहेत. गरीबांच्या देशात हसन अलीसारखे लोक खर्‍या अर्थाने राज्य करतात. पोपट शिंदे बदनाम होतो; हसन अली प्रतिष्ठीत श्रीमंत ठरतो!
हिंदुस्थानचा काळा पैसा मोठ्या प्रमाणात परदेशी बँकांत आहे. तो सर्व काळा पैसा पुन्हा हिंदुस्थानात आणला तर आपला देश फक्त 24 तासांत आर्थिक महासत्ता बनेल. गरिबी आणि बेरोजगारीचे नामोनिशाण उरणार नाही.
हसन अली खानचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले. तीन वर्षांपूर्वी हसन अली खानच्या श्रीमंती दंतकथा मुकेश अंबानींनाही मागे टाकणार्‍या होत्या व आजही त्यांची श्रीमंती अंबानी बंधूंच्या वर आहे. हसन अली खानचे स्वीस बँकेत खाते आहे व त्या बँकेत आठ बिलियन डॉलर्स इतकी रक्कम आहे. हिंदुस्थानी रुपयांत त्या पैशांची मोजदाद करता येणे शक्य नाही. या महाशयांचे उत्पन्नाचे स्रोत काय व हा इतका पैसा नक्की कुणाचा आहे, याबाबत गौडबंगाल आहे. या माणसाने हिंदुस्थानचा 50 हजार कोटी इतका कर चुकवला आहे व तरीही आमच्या देशाच्या वित्त मंत्रालयाने त्याच्यावर कारवाई केली नाही. पोपट शिंदे या तेलमाफियाच्या विरोधात त्याच्या मरणानंतरही रान पेटवले आहे, पण हसन अलीसारखे स्वीस बँकवाले मोकाट आहेत. कुठे आहे तुमचा कठोर कायदा?
बंडाचे वणवे!
गरीबांच्या देशात राज्यकर्ते व धनदांडग्यांविरुद्ध बंडाचे वणवे पेटले आहेत. पोटातली भुकेची आग रस्त्यावर उतरली व त्या आगीने राज्यकर्त्यांची मस्ती बेचिराख केली. ट्युनेशिया, येमेन आणि आता इजिप्तमध्येही बंड भडकले आहे. फरक इतकाच की त्या सर्व देशांत हसन अलीसारखे लोक राजसिंहासनावर बसले होते व आमच्या देशात असंख्य हसन अलीसाठी राज्यकर्ते काम करीत आहेत! सगळा देखावा वरवरचा आहे. येशू ख्रिस्ताने एके ठिकाणी म्हटले आहे - लोकांना कबरीतही श्रीमंती हवी असते. लोक कबरीवरही पांढरा चुना फासून टाकतात, पण त्याने काही कबरी स्वच्छ होत नाहीत. आत तर प्रेत सडतच असते. दुर्गंधी कबरीतही आहे आणि बाहेरही. पण जमाना बदलला आहे. लोक राहण्यासाठी महाल बांधतात. कबरीत प्रेते सडवावीत तसा स्वीस बँकेतही पैसा सडवतात. अशा सडक्या लोकांभोवती आज गर्दी आहे. गर्दी नेहमी असत्याभोवती असते. सत्यासमवेत काही मोजके लोक, काही धाडसी लोकच असू शकतात व त्यांनाच शेवटी हौतात्म्य प्राप्त होते.
भिकारी बादशहा!
श्रीमंतांसारखे भिकारी कोणीच नाहीत. त्यांची पैशांची तहान भागत नाही. त्यांना समुद्रच प्राशन करायचा आहे. मग इतर कोणीही तहानेने मेले तरी चालेल. सुफी फकीर फरीद याला त्याच्या गावचे लोक म्हणाले की, अकबर बादशहा तुझ्याकडे येतो तेव्हा आपल्या गावासाठी त्याला एक विनंती कर. म्हणावं गावात एक शाळा काढून दे. फरीद स्वत:हून कधी अकबराला भेटायला गेला नव्हता. अकबरच त्याला भेटायला यायचा. पण आता स्वत:साठीच काही मागायचं तेव्हा त्याला भेटायला जाणं योग्य. फरीद सकाळीच अकबराकडे गेला. आदरानं त्याला राजवाड्यात नेण्यात आलं. अकबर नमाज पढत होता. फरीद त्याच्या मागे उभा राहिला. अकबरानं नमाज पूर्ण केला. दोन्ही हात आकाशात उंचावले आणि तो परमात्म्याला म्हणाला की, हे परवरदिगार, माझी धनदौलत वाढू दे, माझे राज्य वाढू दे. माझ्यावर कृपा कर!
फरीद आल्यापावली परत निघाला. अकबर उठला तेव्हा त्याला फरीद माघारी चाललेला दिसला. धावत जाऊन त्याने त्याचे पाय धरले अन् म्हणाला, आपण आलात... पहिल्यांदा आलात अन् एकही शब्द न बोलता माघारी निघालात? असं झालं तरी काय? माझ्याकडून काही चुकलं का?
फरीद म्हणाला, नाही, तुझं काही चुकलेलं नाही... माझीच चूक झाली आहे! मीही कुठे भिकार्‍याकडे भीक मागायला आलो! गावातल्या लोकांनी मला खूप वेळा सांगितलं तेव्हा मी म्हटलं की ठीक आहे, जाऊ या. त्यांचं म्हणणं असं होतं की, गावात एक शाळा उघडून द्या. त्याचसाठी आलो होतो. पण नाही, आता नाही मागणार! तू स्वत:च अजून मागतो आहेस! तुझी प्रार्थना म्हणजे तर अजून भिकार्‍याचीच प्रार्थना आहे - आणखी राज्य...आणखी धन...आणखी संपदा! नाही, तुला मी गरीब बनवणार नाही. तू एक शाळा काढशील तर त्यासाठी काही पैसा तर लागेलच अन् तू तितका गरीब होशील. नाही, कुणाला गरीब बनवण्यासाठी मी उत्सुक नाहीये... अन् राहता राहिली शाळेची गोष्ट. तर मी गावच्या लोकांना सांगून टाकेन की ज्याच्याकडून अकबर स्वत:च मागतो आहे त्याच्याचकडून आपण का मागू नये? त्याची मर्जी असेल तर देऊन टाकेल, त्याची मर्जी नसेल तर त्याच्या मर्जीतच आनंदी असणं योग्य आहे...
स्मशानातली कवटी!
श्रीमंतांसाठी आता सर्वत्र वेगळ्या व्यवस्था होत आहेत. गरीबांची झोपडी धारावी आणि जोगेश्‍वरीतच उभी राहील. पेडर रोड, मलबार हिलवर झोपडी उभी राहणे हा श्रीमंतीचा अपमान आहे. पेडर रोडला फ्लायओव्हरसुद्धा उभा राहात नाही. श्रीमंतांचा विरोध आहे. एक बातमी वाचली. तेथील काही श्रीमंतांनी आता वेगळ्या स्मशानभूमीची मागणी केली. हे जरा अतीच आहे. ख्रिश्‍चनांच्या स्मशानभूमीत श्रीमंतांसाठी राखीव जागा असते व अशा लोकांच्या कबरी विशेष सजवल्या जातात. हे लोण आता आपल्याकडेही आले.
एक फकीर एका स्मशानाजवळून जात होता. त्याचा पाय एका मानवी कवटीला लागला. अंधारी रात्र होती. त्याने ती कवटी उचलली आणि तिची खूप क्षमायाचना तो करू लागला. कारण ते स्मशान सामान्य लोकांचे नव्हते! सामान्य आाणि असामान्य लोकांची स्मशानेही वेगळी असतात! जणू मृत्यूनंतरही कोण मोठा, कोण छोटा याचा हिशेब ठेवता येतो! पण जिवंत माणसेच स्मशाने निर्माण करतात. त्यामुळे आपला जीवनातला मूर्खपणा स्मशानातही घेऊन जातात.
ते मोठ्या माणसांचे, खानदानी लोकांचे, राजघराण्याचे स्मशान होते. फकीर चांगलाच घाबरला. ती कवटी घेऊन घरी आला आणि तिच्यापुढे हात जोडू लागला. त्याचे मित्र गोळा झाले आणि म्हणू लागले, डोकं ठिकाणावर आहे का तुझं? या कवटीची कसली क्षमा मागतोस?
फकीर म्हणाला, ही कवटी फार मोठ्या माणसाची आहे. ही सिंहासनावर बसली होती एकेकाळी! आज हा माणूस जिवंत असता आणि माझा पाय याच्या डोक्याला लागला असता तर माझी भरलीच होती म्हणून समजा! हा माणूस जिवंत नाही हे माझं नशीब!
अगदी वेडपट आहेस झालं! मित्र म्हणाले.
फकीर म्हणाला, वेडा मी नाही, हा मेलेला माणूस आहे! जी कवटी सिंहासनावर बसली आहे असं वाटत होतं ती एक दिवस लोकांच्या लाथा खाईल, एका फकिराच्या पायाखाली तुडवली जाईल आणि तक्रारही करू शकणार नाही, माहीत नाही मी कोण आहे ते? असं ताठ्यानं विचारूही शकणार नाही असं कुणाला वाटलं असेल? कुठे गेला तो ताठा? आपल्या पायाखाली कोट्यवधी रुपये असल्याचा भ्रम कुठे गेला? हीच ती कवटी, हीच ती हाडं, हेच सारं. आता ती पायदळी तुडवली जात आहेत!
गरिबी हटाव!
दूरसंचारमंत्री ए. राजा यांनी स्पेक्ट्रम घोटाळ्यात कोट्यवधी रुपये खाल्ले व आता शेवटी तुरुंगात गेले. ते कोट्यवधी रुपये त्यांची कातडी वाचवू शकले नाहीत व कोट्यवधी रुपये असूनही त्यांना सीबीआय कोठडीत झोप येणार नाही. गरिबी नष्ट होत नाही व श्रीमंतांकडचा पैशांचा ओघ थांबत नाही. मूठभर श्रीमंतांचे कोट्यवधी गरीबांवर असलेले राज्य हीच आमच्या देशातील लोकशाही आहे. स्व. आबासाहेब कुलकर्णी गमतीने सांगत, अहो या देशातील गरिबी नष्ट झाली तर आम्ही काय करायचे? राजकारणी लोकांचे नीट चालण्यासाठी या देशातील गरिबी कायम राहायला हवी. मग तुमची गरिबी नष्ट करण्यास आम्हाला निवडून द्या, असे आम्ही लोकांना सांगू शकतो. त्यासाठी खुर्ची मागतो. ती मिळाली की मग आम्ही काही लोकांची गरिबी कमी करतो. तोपर्यंत नवे गरीब तयार होत असतातच. त्यामुळे देशातील गरीबांची संख्या कधी कमी होत नाही आणि आम्ही विनासायास निवडून येतो!...
गरिबी हटाव या घोषणेचा फोलपणा या निवेदनात आहे. ही घोषणा इंद्रकुमार गुजराल यांनी 1969 मध्ये श्रीमती इंदिरा गांधींना सुचविली आणि देशभरात गेली. आज गुजराल जिवंत नाहीत. इंदिरा गांधींची हत्या झाली. गरिबी कायम आहे व हसन अलीसारखे गरीब देशाला अधिक गरीब करून स्वत:चा थाट वाढवीत आहेत.
sanjayraut@rediffmail.com

 

 


Print this page

Send This Page

Pratikriya Kalwa

 

 


आपली प्रतिक्रिया कळवा