दुसरा सूर्य सत्य का मिथ्या?
आपल्या आकाशात सूर्याएवढी तेजस्वी वस्तू आपल्यापैकी कोणीच आतापर्यंत पाहिलेली नाही. याआधी दिसलेला अतिनवतारा किंवा आकाशातला दुसरा सूर्य इ.स. १६०४ मधे पाहिला गेला. आज विशी पार केलेल्या पिढीने दोन तेजस्वी धूमकेतू, दोन खग्रास आणि एक कंकणाकृती सूर्यग्रहण, बुध आणि शुक्राची अधिक्रमणं आधीच पाहिलेली आहेत. तार्‍याचा स्फोट किंवा अतिनवतारा बघता येण्याएवढी आताची पिढी नशीबवान असेल काय?
रिंग अभ्रिका : दृष्य प्रकाशात काढलेली प्रतिमा 
अगदी दहा हजार वर्षांपूर्वीही एक अतिनवतार्‍याचा (एल्जहदन्) स्फोट चित्ररूपात रेकॉर्ड केल्याची नोंद आहे. आजच्या कश्मीरमधेही अशाच स्वरूपाच्या, साधारण काही हजार वषर्ं जुन्या नोंदी सापडल्या आहेत, अर्थात चित्रलिपीवरून बांधलेले हे अंदाज आहेत. अगदी अलीकडे, म्हणजे इ.स. १०५४ मध्ये झालेला स्फोट चीन आणि जपानमधून पाहिल्याच्या खुणा आहेत. हिंदुस्थानातून हा स्फोट बघितल्याच्या नोंदी नाहीत, हे पावसाळ्यामुळेही झालं असेल. या स्फोटातून उरलासुरलेला वायू हा आकाशातल्या पहिल्या तीन सर्वात तेजस्वी रेडिओ
स्रोतांपैकी एक आहे. आज अशाच एका तार्‍याची घटका भरत आली आहे. मृग नक्षत्रातला, काहीशे प्रकाशवर्ष दूर असणारा, काक्षी हा लाल रंगाचा तारा कोणत्याही क्षणी अतिनवतारा बनू शकतो आणि आपल्याला आकाशात दिवसाढवळ्या दोन सूर्य किंवा रात्रीचाही लख्ख उजेड असा अनुभव येऊ शकतो. पण हे अतिनवतारे असतात काय? नावावरून अंदाज आलाच असेल की हे तारे म्हणजे नवीन दिसणारा तारा असतो. पण हे थोडं चुकीचं नाव आहे. अशा प्रकारचा स्फोट तारा मरताना होतो. मुळात तारा जिवंत असतो म्हणजे साधारणपणे त्याच्या गाभ्यात हायड्रोजनचे चार अणू एकत्र येऊन एक हेलियमचा अणू तयार होतो आणि या प्रक्रियेतून ऊर्जा बाहेर पडते. या ऊर्जेमुळे गुरुत्वाकर्षणाचा तोल साधला जातो आणि वायूरूपातल्या तार्‍याचा आकारही (फारसा) बदलत नाही. जेव्हा गाभ्यातला हायड्रोजन संपतो तेव्हा हेलियमच्या अणूंमधून लिथियमचे अणू तयार होतात. अशा प्रकारे जड मूलद्रव्य तयार होत होत, ऊर्जा बाहेर टाकली जाते आणि सरतेशेवटी लोखंड तयार होतं. जसजशी जड मूलद्रव्यं तयार होतात, तसतशी अतिरिक्त ऊर्जेमुळे तार्‍याची बाहेरची आवरणं प्रसरण पावतात. लोखंडाचे अणू मात्र एकत्र येऊन आणखी जड अणू बनवण्यासाठी बाहेरून ऊर्जा द्यावी लागते. तार्‍याचा गाभा जेव्हा पूर्ण लोखंडाचा बनतो तेव्हा तार्‍याच्या मृत्यूला सुरुवात होते. तार्‍याच्या आतून ऊर्जा तयार होऊन बाहेर पडत नाही, पण तेव्हा तार्‍याच्या बाहेरच्या आवरणांचं खूप जास्त प्रसरण झालेलं असतं (सूर्याच्या बाबतीत सूर्याचा आकार मंगळाच्या कक्षेएवढा होईल.) आणि कदाचित बाहेरची काही आवरणं तार्‍याच्या गुरुत्वाकर्षणाच्या पकडीतून निसटलेली असतात.
कॅस ए : रेडिओ किरणांमधली प्रतिमा
आतून ऊर्जा बाहेर पडत नसल्यामुळे तार्‍याच्या गाभ्याचा ताबा गुरुत्वाकर्षण घेतं आणि अतिप्रचंड वेगाने संपूर्ण गाभा आकुंचन पावतो; त्यामुळे गाभ्याचा स्फोट होतो. हा स्फोट म्हणजे अतिनवतार्‍याचा जन्म किंवा अतिनवतारा (नवतारा ही घटना वेगळ्याच प्रकारची असते आणि त्याचा अतिनवतार्‍याशी नामसाधर्म्य सोडल्यास संबंध नाही.). अतिनवतार्‍याचेही वेगवेगळे प्रकार केलेले आहेत,त्यातले प्रकारचे अतिनवतारे हे विश्‍वरचनाशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी वापरले जातात. आपल्या दीर्घिकेतल्या (दीर्घिका म्हणजे तारे, वायू इत्यादींचा गुरुत्वाकर्षणाने बांधलेला प्रचंड मोठा समूह. आपल्या दीर्घिकेचं नाव आकाशगंगा.) लांबवरच्या अतिनवतार्‍याचा अभ्यास करून विशिष्ट प्रकारच्या अतिनवतार्‍याचे काही गुणधर्म लक्षात आले. हेच गुणधर्म आपल्या आकाशगंगेबाहेरच्या दीर्घिकांमधल्या अतिनवतार्‍यांचेही असतील असं गृहीत धरून, बाहेरच्या अतिनवतार्‍यांचा अभ्यास करून, त्या दीर्घिकांचं आपल्यापासूनचं अंतर निश्‍चित करता येतं. अर्थात ही पद्धत आपल्या जवळ असणार्‍या दीर्घिकांसाठीच वापरता येते, पण तरीही या पद्धतीचा मोजपट्टीसारखा केला जाणारा उपयोग वादातीत आहे.
एकदा तार्‍याचा स्फोट झाला की त्यातून प्रचंड प्रमाणात वायू बाहेर फेकला जातो. स्फोटानंतर उरलेल्या आतल्या गाभ्याचं वस्तूमान किती आहे यावरून त्याचं भविष्य ठरतं. सूर्याच्या वस्तुमानाच्या १.४ पटीपेक्षा कमी वस्तुमान असेल तर त्या गाभ्याचा श्‍वेत बटू बनतो. त्यातून खूपच कमी ऊर्जा बाहेर पडते त्यामुळेच असे खूप कमी श्‍वेत बटू आपल्याला माहीत आहेत. रात्रीच्या आकाशातल्या सर्वात तेजस्वी व्याध तार्‍याच्या जोडीने असाच एक श्‍वेत बटू आहे. व्याध तार्‍याच्या वर्णपटावरून या श्‍वेत बटूचा शोध लागला. जर गाभ्याचं वस्तुमान सूर्याच्या १.४ पटीपेक्षा जास्त असेल तर तार्‍याचा न्यूट्रॉन तारा बनतो. श्‍वेतबटू इलेक्ट्रॉन्सचा बनलेला असतो, तर न्यूट्रॉन तारा नावाप्रमाणेच न्यूट्रॉन्सचा बनलेला असतो. सगळ्यात जड गाभा, ज्याचं वस्तुमान सूर्याच्या ४-५ पटीपेक्षा जास्त असतं, त्याचं कृष्ण विवर बनतं. या सगळ्या स्थिती तार्‍याच्या मृत्यूनंतरच्या आहेत. तार्‍यातून आता फारशी ऊर्जा बाहेर पडत नाही त्यामुळे असे तारे शोधणं
कठीण जातं.
स्फोटातून तार्‍यातून बाहेर पडलेल्या वायूच्या तापमानामुळे आणि आजूबाजूच्या, मागच्या तारे, दीर्घिकांच्या प्रकाशामुळे हा वायू आपल्याला निदान काही वर्षंतरी दिसत राहतो. असाच एक अतिनवतार्‍याचा राहिलेला भाग म्हणजे आकाशात रेडिओ दुर्बिणींना दिसणारा प्रचंड तेजस्वी स्रोत, कॅस-ए. रोझेट अभ्रिका, रिंग अभ्रिका असे प्रचंड वायूमेघ साध्या दुर्बिणीतूनही आपल्याला पाहता येतात. हा वायू पुढे दीर्घिकेत मिसळून जातो आणि नवीन तारे जन्माला येण्यासाठी कच्चा माल पुरवतो. आतमधे उरलेलं किंवा वायूतून बाहेर फेकलं गेलेलं तार्‍याच्या गाभ्याचं अंधारं कलेवर मात्र दीर्घिकेच्या केंद्राभोवती फिरत राहतं.

सध्या आकाशात दिसणारे ग्रह 
शुक्र : सध्या सूर्योदयाआधी दोन तास शुक्र उगवतो. सूर्योदयाच्या अर्धा तास आधीपर्यंत शुक्राची चांदणी पूर्वेच्या क्षितिजाजवळ दिसत असते. पूर्वेच्या आकाशातली, पहाटेच्या वेळची (चंद्र सोडून) आकाशातली सर्वात तेजस्वी वस्तू म्हणजे शुक्र, जो ओळखणं कठीण जाऊ नये.
गुरू : सूर्यास्तानंतर पश्चिमेला, संधिप्रकाशात पश्चिम क्षितिजाजवळ सध्या गुरू दिसत आहे. साधारण नऊच्या सुमारास गुरूचा अस्त होतो. सूर्यास्तानंतर आकाशातली (चंद्राखालोखाल) सर्वात तेजस्वी वस्तू म्हणजे गुरू, जो ओळखायला कठीण जाऊ नये.
मृग नक्षत्र : आपल्यापैकी बहुतेकांना पावसाच्या आगमनामुळे मृग नक्षत्र माहीत असतं. सध्या सूर्यास्ताच्या वेळेस मृग नक्षत्र पूर्व क्षितिज आणि उत्तर-दक्षिण रेषा यांच्या मध्ये थोडं दक्षिणेला असेल. साधारण सव्वाआठच्या सुमारास क्षितिजापासून सर्वात जास्त उंचीवर यातले तारे दिसतील. आकाशातला बहुधा सर्वात सुंदर असणारा हा तारकासमूह ओळखणं तसं सोपं आहे. मृगातले तारे चांगल्यापैकी तेजस्वी आहेत. आकृतीत दिल्याप्रमाणे मृगात एक मोठा चौकोन आहे. त्यातला राजन्य हा तारा मृगातला सर्वात तेजस्वी आणि आकाशातला
सहाव्या क्रमांकाचा तेजस्वी तारा आहे. चौकोनाच्या विरुद्ध दिशेला आकाशातला आठव्या क्रमांकाचा तेजस्वी तारा काक्षी आहे. काक्षी हा लाल रंगाचा राक्षसी आकाराचा तारा आपल्यापासून काहीशे प्रकाशवर्षे अंतरावर आहे. या तार्‍याचा कोणत्याही क्षणी स्फोट होऊन मृत्यू होऊ शकतो. आपल्या नक्षत्रांमधे खरं तर मृग नसून मृगशीर्ष हे नक्षत्र आहे. मृगशीर्षातले तारे अंधूक असले तरी मृगातल्या इतर तार्‍यांमुळे हे नक्षत्र ओळखणं कठीण जाऊ नये. संपूर्ण हिवाळा मृग नक्षत्र आकाशात दिसतं.
- संहिता जोशी (राष्ट्रीय खगोलभौतिकी केंद्र, पुणे)
sanhita.joshi@gmail.com

 

 

 

Print this page

Send This Page

Pratikriya Kalwa


 

आपली प्रतिक्रिया कळवा