इतिहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुराणकथा या एकेकाळचा इतिहास आहेत.

इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व अभ्यास. या शब्दाची व्युत्पत्ती खालीलप्रमाणे सांगितली जाते : इतिहास = इति +ह्+आस = हे असे घडले
इतिहासाची सर्वमान्य अशी व्याख्या नाही. प्रसिद्ध इतिहासकार ई.एच.कार यांच्या मते 'भूतकाळ व वर्तमानकाळ यांतील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय.'
बर्कहार्ड यांच्या मते 'इतिहास म्हणजे एका युगातील दखल घेता येणाऱ्या घटनांची दुसऱ्या युगाने केलेली नोंद होय.'

प्राचीन साहित्यात इतिहास[संपादन]

राजशेखर आपल्या काव्यमिमांसेत लिहितात – ‘स च द्विविधा परक्रिया पुराकल्पाभ्याम् |’ त्याचा अर्थ असा – परक्रिया व पुराकल्प अशी इतिहासाची द्विविध गती आहे. भारतीय साहित्यामध्ये इतिहासाला वेदाच्या बरोबरीने महत्त्व दिलेले आहे. ऋग्वेदसंहितेत इतिहास सयुक्त मंत्राचा संग्रह आहे. तसेच नारद लिखित छांदोग्योपनिषद या ग्रंथात इतिहास-पुराणाला पंचम वेद म्हटले आहे. संस्कृत वाङ्‌मयामध्ये कथेच्या रुपाने इतिहास आलेला आढळतो. कौटिल्य याने केलेल्या व्याख्ये प्रमाणे इतिहासात पुराणे, इतिवृत्त, आख्यायिका, उदाहरण, धर्मशास्त्रअर्थशास्त्र इतक्या विषयांचा समावेश होतो.

आधुनिक व्याख्या[संपादन]

हॅप्पाल्ड यांच्या मते 'इतिहास हा अनुभवांचा नंदादीप होय.' इतिहास म्हणजे मानवजातीच्या जीवनप्रवाहाचा अभ्यास असेही म्हणता येते. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे कालखंद असू शकतात. इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो. या शिवाय या सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि परिणाम यांचा अभ्यास याचाही अंतर्भाव इतिहासात होतो. इतिहास या विषयाचे आकलन करून घेताना प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या इतर घटकांची आवश्यक किमान माहिती व संस्कृतीचा सखोल अभ्यास असा दृष्टिकोन असावा लागतो.

बाह्य दुवे[संपादन]