|

अभिजात ‘संगीत सौभद्र’ पुन्हा रंगभूमीवर

मराठी रंगभूमीवरील पहिले अभिजात नाटक गणले जाणारे आणि आजवर हजारो प्रयोग होऊनही लोकप्रियता कायम असलेले अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित ‘संगीत सौभद्र’ पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. 

मुंबई- मराठी रंगभूमीवरील पहिले अभिजात नाटक गणले जाणारे आणि आजवर हजारो प्रयोग होऊनही लोकप्रियता कायम असलेले अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित ‘संगीत सौभद्र’ पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहे. 130 वर्षापूर्वी रंगभूमीवर सादर झालेले हे नाटक नव्या रंगरूपात सादर होत असून त्यात अनेक नव्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

‘संगीत सौभद्र’ हे नाटक अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी 1882 मध्ये लिहिले. 18 नोव्हेंबर 1982 रोजी पुण्यातील ‘पूर्णानंद’ नाटय़गृहात त्याचा पहिला प्रयोग झाला होता. अर्जुन आणि सुभद्रा या पौराणिक पात्रांवरील या नाटकात तेव्हा भाऊराव कोल्हटकर, बाळकोबा नाटेकर, शंकरराव मुजुमदार, मोरोबा वाघोलीकर आणि स्वत: अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी भूमिका केल्या होत्या. या नाटकातील ‘अरसिक किती हा शेला’, ‘नच सुंदरि करूं कोपा’, ‘नभ मेघांनीं आक्रमिलें’, ‘प्रिये पहा रात्रीचा समय’, ‘वद जाऊ कुणाला शरण’, ‘पावना वामना या मना’, ‘राधाधरमधुमिलिंद’ या एकाहून सुरेल पदांमुळे या नाटकाने अमाप लोकप्रियता मिळवली. बालगंधर्वानीही या नाटकातील सुभद्रेची स्त्री पार्टी भूमिका करून या नाटकाची लोकप्रियता कळसावर नेली होती. गेल्या 130 वर्षात या नाटकाचे हजारो प्रयोग झाले असून अनेक कलाकारांनी त्यात भूमिका केल्या आहेत.

आता मनोहर नरे यांची ‘ओम नाटय़गंधा’ ही संस्था, बालगंधर्व यांच्या जयंतीचे 125वे वर्ष आणि ‘गंधर्व नाटक कंपनी’च्या स्थापनेच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणत आहे. यशवंत इंगवले यांनी हे दिग्दर्शित केले (या नाटकाची तालीम सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.) असून ज्ञानेश महाराव यांनी या नाटकाची रंगावृत्ती लिहिली आहे. प्रसिद्ध सिने कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवर नेपथ्य केले आहे.

मराठी रंगभूमीच्या 170 वर्षाच्या इतिहासात प्रथमच संवादिनी वादक आरती गोसावी ही महिला या नाटकाला संगीत साथ करणार आहे. नाटकात ‘लाइव्ह’ संगीताचा वापर होणार आहे.

बालगंधर्व आणि त्यांचे गुरुबंधू मास्टर कृष्णकांत फुलंब्रीकर यांचे अभ्यासक विक्रांत आजगावकर सुभद्रेची स्त्री पार्टी भूमिका करणार आहेत. तर गिरीश परदेशी (अर्जुन), संदीप राऊत (कृष्ण), ज्ञानेश महाराव (नारद), अनंत राणे (वक्रतुंड), पूजा कदम (रुक्मीणी) यांच्या भूमिका आहेत. या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग 25 ऑगस्टच्या शनिवारी दादर येथील शिवाजी मंदिर नाटय़गृहात होणार आहे.

Print Friendly
Share it

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


* Captcha

HTML tags are not allowed.