उठि गोविंदा उठि गोपाला
उषःकाल झाला, उठि गोविंदा, उठि गोपाला
हलकेहलके उघड राजिवा नील नेत्रकमला

तुझ्यापरी बघ जीवनवारा, मिठी मारतो प्राजक्ताला
धवलकेशरी मृदुल सुमांचा पाऊस अंगणी झिमझिमला

पर्णपोपटी हिंदोळ्यावर कंठ फुटतो आनंदाला
तुज भूपाळी आळवित सुंदर चढली गगनी विहंगमाला

गोठ्यामधले मुके लेकरू, पीत झुरुझुरू कामधेनुला
किती आवरू भरला पान्हा, हसवि अरुणा तव आईला
शब्दार्थ
विहंग - पक्षी