Leading International Marathi News Daily
शनिवार, २ मे २००९
  शिक्षण वजा शिक्षा
  शिक्षेविना शिस्त
  अवघड गोष्ट
  प्रकाशशलाका अहिल्याताई
  विज्ञानमयी
  प्रतिसाद
  संकोचाचा पडदा दूर सारणारा जबरदस्त प्रयोग
  स्मरण राष्ट्रदुर्गेचे!
  भाषेकडे कुतूहलाने पाहू या
  तुनचा रंग कोणता?
  पूर्व दिव्य ज्यांचे..
  ऐसे कठिण कोवळेपणे
  फोल्डिंग आडोसा
  दिवस वाळवणांचे...
  पुण्यश्लोक राणी अहिल्या आणि अपार्थिवाचे रंग
  सुटीची संकल्पना

 

भोपाळला राहायला आल्या दिवसापासून महेश्वरला जावे असे फार मनात होते. किंबहुना इथे येण्यापूर्वीपासूनच महेश्वर नावाचे आकर्षण होते. त्यामुळे मध्य प्रदेशात आल्याक्षणी पहिल्यांदा महेश्वरचेच दर्शन घ्यावे असा विचार होता, पण महेश्वरी जावे तर काही काम काढून नव्हे, तर नुसतेच अहिल्येच्या काठी जाऊन निवांत होऊन यावे- असाही आतला एक विचार होता!
हा निवांतपणा काढावा कुठून? आपली मुळं उपटून कुठल्या दुसऱ्या गावी रुजवताना जो कोलाहल भोवती दाटतो, त्या भोवऱ्यातून फिरताना मनातली इच्छा अशी सहज पूर्ण होणे शक्य नव्हते. पुढे कामानिमित्ताने मध्य प्रदेशमधील काही भाग माझ्या पायाखाली उलगडत राहिला, पण तरीही महेश्वरी जाणे लांब पडत राहिले. जणू काही पकडायला जावे आणि ते दूर दूर जात राहावे, अशी नुसतीच एक भूल मनावर दाटून येत गेली आणि मग जेवढे जाणे लांबत गेले, तेवढा त्या नावाचा एक ठसा मनात अधिकाधिक दृढ होऊ लागला. कुठे जबलपूरला भेडाघाटावर, कुठे

 

होशंगाबादच्या घाटावर, कुठे देवासच्या टेकडीवर, कुठे उज्जनीच्या वाटेवर असताना मध्येच महेश्वरची आठवण उसळून वर यावी.. ‘एवढा काय ध्यास घ्यावा तो? जाऊ कधीतरी, जमेल कधीतरी,’ अशी आपणच आपल्या मनाची समजूत काढत राहावी.. तसा भोपाळहून महेश्वरचा प्रवासही अगदी जवळचा नव्हे. त्यामुळे उठले आणि गेले हेही शक्य नव्हते.
महेश्वर असे मनात रुंजी घालत असताना कधीतरी एक दिवस पोचलेच मी त्या गावाच्या वेशीपाशी. ‘पुण्यश्लोक राणी अहिल्येच्या गावात आपले स्वागत असो’. गावाची वेस ओलांडता ओलांडताच लक्षात येते की, गावावर अजूनही राणीचे राज्य आहे आणि ती राणी ‘पुण्यश्लोक’ आहे. ज्या गावात समुद्र असतो, तिथे समुद्राचा आभास चराचरात भरून राहिलेला असतो. समुद्र नजरेला दिसत नसला, आवाज कानावर पडत नसला, तरी त्याचे अस्तित्व कुठूनतरी मनाला भिडत राहते. महेश्वरला समुद्र नाही, पण वाटले इथल्या हवेच्या कणाकणात आहे तो एका पुण्यश्लोक आत्म्याच्या वावराचा आभास. महेश्वर-ओंकारेश्वर ही नावे आवळी-जावळी घ्यावी तशी एकत्र येतात. साहजिकच प्रवासाचा टप्पा महेश्वरहून ओंकारेश्वरवर पडून भोपाळला परतत होता. ओंकारेश्वर-ममलेश्वर बारा ज्योतिर्लिगांपैकी एक, पण तरीही ओंकारेश्वरापेक्षा मनात महेश्वरची जवळीक अधिक होती. वाटले, कदाचित ही जवळीक मराठीपणाची असेल, पण वेशीपाशी पोचले आणि लक्षात आले की, यात जेवढे मराठी असणे आहे, त्याहूनही अधिक अहिल्येचे ‘पुण्यश्लोक’ असणे लगटून आहे हृदयापाशी.
अहिल्याबाईंचा जन्म १७२५ सालचा. वडील माणकोजी शिंदे आणि आई सुशीलाबाई. आई धर्मपरायण. तिच्या छायेखाली लहानपणापासूनच अहिल्या संस्कारसंपन्न झाली. मुलींच्या शिक्षणाची कल्पनाही अस्तित्वात नसताना माणकोजींनी आपल्या मुलीला घरातच थोडेफार शिक्षण दिले. मुलीच्या जन्मानंतर कुणा ज्योतिषाने भविष्य वर्तविले होते, की मुलीच्या हातावर राजयोग आहे. ज्योतिषाची भविष्यवाणी लवकरच खरी झाली. बाजीराव पेशव्यांसोबत मल्हारराव होळकरांचा मुक्काम चौंडी गावात असताना एका संध्याकाळी शिव मंदिरात आलेल्या लहानशा तेजस्वी मुलीला पाहून ते प्रभावित झाले. आपल्या मुलासाठी त्यांनी अहिल्येच्या वडिलांकडे मागणी घातली. अहिल्या होळकरांची सून, खंडेरावांची पत्नी झाली. भले-बुरे पचवत माणकोजींची अहिल्या सासरच्या घरी मोठी होत गेली. खंडेरावाच्या अकाली मृत्यूनंतर अहिल्याबाई सती जाण्यासाठी निघाली असता तिला मल्हाररावांनी थांबवले. प्रजेसाठी तिला सती न जाण्याची गळ घातली. नवऱ्यापाठीमागे स्त्रीने जगात राहू नये, अशा काळात अहिल्याबाई केवळ कर्तव्यबुद्धीने राहिली. पुढे मल्हाररावांचा मृत्यू झाला. अहिल्याबाईचा मुलगा मालेराव, मुलगी मुक्ताबाई, नवरा आणि सासऱ्यांच्या मृत्यूनंतर मृत्यूचा घाला अहिल्याबाईंवर सतत होत राहिला. नवऱ्याच्या पश्चात मालेराव गादीवर बसला, पण त्याच्या अविवेकी वागण्याने प्रजा हैराण झाली. प्रजेचे दु:ख अहिल्याबाईंना डाचत राहिले. कुणा निरपराधाच्या मृत्यूचे पातक मालेरावाच्या माथी लागले. त्यातच झालेल्या त्याच्या आकस्मिक मृत्यूने संशयाचे मोहोळ अहिल्याबाईंभोवती उठले. मालेरावापाठोपाठ अहिल्याबाईंचा नातू, मुक्ताबाईचा मुलगा अकाली गेला. त्याच्या निधनाच्या दु:खाने मुक्ताबाईचा नवरा गेला. मुक्ताबाई सती निघाली. मातृहृदयाने मुक्ताबाईची विनवणी केली, ‘सती जाऊ नकोस. आईसाठी थांब.’ पण मुक्ताबाई बधली नाही. तीही गेली आणि सांसारिक पातळीवर अहिल्याबाई रिक्त होत गेली. सासरा, नवरा, मुलगा, नातू, जावई आणि सरतेशेवटी लाडकी मुलगी.. सगळे सगेसोयरे जाऊन बाईंपाशी उरली त्यांची प्रजा. जणू प्रजेसाठी सारे बंध तुटून जाणे अपरिहार्य होते. आजही महेश्वरीबाईंची राजगादी पाहावी आणि इहलोकीच्या सगळ्या दु:खापार अहिल्याबाईंच्या कर्तृत्वाचा पसारा जाणवून थक्क होऊन जावे.
चौसोपी पुराणकालीन वाडा. काळ्या शिसवी रंगाचा. अपार शांतीचा. चौकात मधोमध तुळशी वृंदावन. वाडय़ाला एखाद मजल्याचा डोलारा. वाडय़ाची वेस ओलांडून आत यावे तर डावीकडे अहिल्याबाईने जिथून न्याय-निवाडा केला, राजकारण पाहिले, ती राजगादी मांडून ठेवलेली. वास्तूभोवती इतके अपार साधेपण की कुठे हंडय़ा-झुंबऱ्यांचा सोस नाहीे, कारंजांची आतषबाजी नाही की दौलतीची अतिरंजित मांडणी नाही. आधीच मनात भरून असलेला आदर, पावलोपावली दुणावत जातो. मनात येते, याच गादीवर बसून बाईंनी राघोबांना पत्र लिहिले असेल. पुरुषाखेरीज कुणा विधवा स्त्रीने राजगादीवर बसावे हे कसे पुरुषी विचारसरणीला मान्य व्हावे? वर्तमानकाळातही स्त्रीचे वर्चस्व सहन करणे पुरुषाला कठीण जाते, हा तर दोनशे वर्षांपूर्वीचा काळ. जेव्हा बाईला नवऱ्या अपरोक्ष जगण्याचीही मुभा नव्हती. अशा काळात गंगाधरपंतांची कुटिल राजनीती जाणून दत्तकाचा प्रस्ताव बाईंनी धुडकावून लावला. गंगाधरपंतांनी राघोबा पेशव्यांचे कान फुंकले. आपल्या पुरुषी सामर्थ्यांच्या अहंकारात बाईंना अबला समजून राघोबांनी इंदौरकडे कूच केले. स्त्रीच्या शक्तीचा स्रोत पुरुषाला कैकदा समजून घेता येत नाही. विधवा, अबला, असहाय्य वाटणारी ती स्त्री अहिल्याबाई होती हे राघोबादादांच्या लक्षात आले नाही. राघोबांचे आव्हान राजकारणकुशल अहिल्याबाईंनी स्वीकारले. रणनीती केवळ युद्धभूमीवरच नसते हे जाणून युद्धाची सर्वशक्तीनिशी तयारी करून राघोबांना पत्र लिहिले, ‘मी बाईमाणूस. माझ्याशी युद्ध करून जिंकलात तरी तुमची हार आहे आणि हारलात तर कुणालाही तोंड दाखवायला जागा उरणार नाही.’ युद्ध न करता परतण्यावाचून राघोबांपुढे पर्याय उरला नाही.
राजस्थानच्या चंद्रावतांचा उठाव अशा वेळी झाला, जेव्हा अहिल्याबाईंचे सेनापती तुकोजीराव दक्षिणेकडच्या युद्धात गुंतले होते. अहिल्याबाईंनी आपली सगळी सेना एकवटली. सेनेला गरजून सांगितले, ‘पळून येऊ नका. लक्षात ठेवा. मला विद्रोह्य़ांची मुंडकी हवी आहेत. चंद्रावतांच्या राणाला जिवंत पकडून तोफेच्या तोंडी दिल्याचे वर्तमान पाहिजे. यात जर काही कसूर झालीच, तर मी स्वत: भाला घेऊन युद्धभूमीवर उभी राहीन आणि शत्रूचा नाश करीन, पण तत्पूर्वी कसूर करणाऱ्यांची गय करणार नाही.’ अखेरीस युद्धात सौभगसिंह चंद्रावताला तोफेच्या तोंडी दिले गेले. होळकरांच्या सेनेने राजपुतांच्या उठावाचा बीमोड केला. अहिल्याबाईंच्या सन्मानार्थ पुण्यात पेशव्यांनी विजयोत्सव साजरा केला. चोर, डाकू, लुटेऱ्यांना प्रेमाने जिंकून घेणारी, घरभेद्यांना कठोर सजा देणारी, आपल्या आजूबाजूच्या कुटिलनीतीला पुरून उरणारी आणि तरीही धार्मिक, पुण्यशील राणी.
अहिल्याबाईंची सारी धनदौलत म्हणजे तिचे देव. वाडय़ाच्या मागच्या अंगाला पारंब्या नसलेल्या वडाखालच्या खोलीत अहिल्याबाईंचे देव हारीने मांडून ठेवलेले दाखविले जातात. ‘या वडाला पारंब्या नाहीत. केवळ दोन मुळं एकमेकांत गुरफटून सर्पागत लपेटलेली आहेत,’ पुजारी सांगतो. दाखवतो, अहिल्याबाईंच्या पूजेतली शंकराची पिंडी, कृष्णाचा पाळणा. हा खंडोबा, हा अमुक, हा तमुक.. देवांची ओळख घडवली जाते. ज्या अपार श्रद्धेने अहिल्याबाईंनी पूजा केली असेल तेच देव आज आपल्यासमोर मांडून ठेवले आहेत ही जाणीवही नतमस्तक करते. नकळत हात जोडले जातात. श्रद्धेपार उरते साध्वी राणी अहिल्या.. महेश्वरचा श्वास.. केवळ या वाडय़ावरच नाही तर एकूणच महेश्वर गावावर वाडा संस्कृतीची झलक नजरेस पडते. नाशिक- पुण्याकडच्या जुन्या गल्लीबोळातून फिरत असावे असे वाटत असताना मधेच मध्य प्रदेशाच्या खुणा सापडत जातात.
वर्तमान-भूतकाळाची सांगड घालत गावातून चालत राहावे- विणकरांचा शोध घेत.. मागावर अनेक रंगांची रिळं चढवलेली, तलम सूत, रंगांचा माहोल. महेश्वरी साडीचा एक अपूर्व ठसा अहिल्याबाई गावावर उमटवून गेली आहे. ‘आपली साडी-चोळी महेश्वरी येऊन घेऊन जा’ हा सांगावा तिने केवळ आनंदीबाईला, राघोबांच्या राणीलाच नाही, तर पुढल्या पिढीच्या साऱ्या लेकी-सुनांना दिला. अजूनही महेश्वरी यावे, आपली साडी-चोळी घेऊन जावे. पुण्यश्लोक अहिल्येचा हात मस्तकी ठेवून घ्यावा.
महेश्वरी वस्त्राचे लेणे शोधत मी फिरत जाते, विणकरांच्या फळीतून. माझ्यातल्या स्त्रीत्वाची वस्त्रतहान पुरवताना मग एकामागून एक महेश्वरी साडय़ांचे वाण माझ्यासमोर ठेवले जातात. प्रत्येक वेळी अंगाभोवती पदराचे लपेटणे, उलगडणे.. बाजूला टाकणे. रेशमी वस्त्राची उघड-मिट. मृदू मुलायम स्पर्शाची वलये माझ्याभोवती. रूप गौण ठरते. वय अल्लाद पावलांनी परतते. सगळ्यापार उरते माझ्यातले स्त्रीत्व. जो देह घेऊन मी आले आहे, त्याचा अपार उत्सव. माझ्यासमोर पूर्णदेही आरसा. आरशाचीच उमटलेली एक कौतुकभरली नजर माझ्याभोवती फिरते. चैत्राच्या रंगाचा उल्हास बाहेर झाडावर, आत त्याच गडद रंगांचा उल्हास माझ्या देहावर. अशात मी थांबते एका सोनेरी वस्त्रापाशी. ‘ही नको, फारच सोनेरी आहे रंग,’ माझी सखी सांगते आणि मी तर अडून बसते त्याच वस्त्रापाशी. वाटते, सोनेरी रंगाचा हा हव्यास किती पुराणकालीन! ‘तोच कांचनमृग!’ तिने मागितला. हट्ट धरला होता. तिच्या स्त्रीत्वातून मी माझे स्त्रीत्व गुंफून घेते. ‘आवडली असेल तर घे. मला काय?’ सखी खांदे उडवून सांगते. सोनेरी रंगाच्या साजापेक्षाही काहीतरी अपार सुख या वस्त्रातून जाणवत आहे, हे कसे शब्दातून मांडावे, या विचारापाशी मी थबकते, तोच माझ्यासमोर साडय़ांची रास रचणारा पुरुष तिला सांगतो की, रंग नाही तर या वस्त्राला स्पर्शाची जादू आहे. मी स्तिमित नजरेने त्याचा ठाव घेते. जे केवळ स्त्री म्हणून याक्षणी मीच उपभोगू शकते, असे मला वाटत होते ते पुरुषालाही कसे कळू शकले? एक पळभर स्त्री-पुरुष भेद जाऊन उरते महेश्वरी वस्त्राचे अलौकिकत्व, जे स्त्री म्हणून मला कळले, जे विणकर म्हणून त्याला कळले. पाण्यावर वर्तुळाकार तरंग उमटावा तसा संवादाचा एक अनोखा झंकार क्षणभर उमटून विरून जातो. तो अथक माझ्यासमोर वस्त्रांची वाण उलगडत राहतो. मी भरभरून वस्त्र अंगावर घेत राहते. मी साध्य. तो माध्यम. महेश्वरच्या राणीचे वाण इतक्या काळानंतरही माझ्यापर्यंत पोहोचवले जाते. आम्हा दोघींमधला तो एक दुवा. तिथून निघून पुन्हा घाटावर यावे तर समोर अशीच रंगीत वस्त्रं पसरलेली. जणू हा घाट रंगीत वस्त्रांच्या साजाकरिताच बांधलेला असावा. झाडावर चैत्र मासाचा रंगविभोर. पलीकडे नर्मदेचे चमकणारे अथांग पात्र. दुपार उतरून जाते पाण्यापार..
माझ्या हातातील कॅमेऱ्याच्या नजरेतून विविध प्रतिमांनी महेश्वरचा घाट उलगडत जातो. किल्ल्यात महादेवाचे मंदिर. असंख्य पायऱ्यांनी बांधून काढलेला घाट. घाटावर छत्र्यांची गर्दी. घाटावरली मुक्ताबाईंची छत्री मोठी. त्यामानाने अहिल्याबाईची छत्री साधी-सुधी. तिथेही कसला बडेजाव नाही. नदीत तरंगणाऱ्या रंगीत नावा. घाटावर शिवलिंगाची पूजा करणाऱ्या बाया. डोईवर हिरवा-पिवळा पदर. शंख, शाळिग्राम, रुद्राक्ष घेऊन फिरणाऱ्या भिल्लिणी. त्यांचे तीक्ष्ण घारोळे डोळे. धारदार नाक. बोरं-फळं घेऊन नदीकिनारी बसलेल्या बाया. हा सगळाच तर पसारा घाटाभोवती. त्यातून फिरणारे प्रवासी, काही शतकापूर्वी बांधलेला घाट आजच्या काळातही इथल्या लोकांचे पालनपोषण करतो आहे.
नदी ओलांडून पलीकडे जाण्यासाठी नावाडी मागे लागतो. ‘तीनशे रुपये?’ मी पलीकडच्या काठावर नजर टाकते. इतक्या थोडय़ा अंतरासाठी इतके पैसे घ्यावे? ही तर चक्क लूटमार! एकूणच मध्य प्रदेशमध्ये उद्योगधंद्यांची भरभराट नाही. गुजरात-महाराष्ट्राच्या तुलनेत तर हा प्रदेश अनेक ठिकाणी अजून मागासलेलाच वाटतो. महेश्वरही त्याला अपवाद नाही. आधुनिक काळात असूनही पाण्यात उभ्या असलेल्या किल्ल्याप्रमाणेच भूतकाळ जगणारे. वाटते, हा घाट नसता, महेश्वरी साडी नसती, किल्ला बांधला नसता, पूजाअर्चेचा पसारा नसता तर या इतक्या लोकांची उपजीविका कशावर झाली असती? केवळ आपल्या काळातल्याच लोकांची नव्हे, तर शतकानुशतकांसाठी उपजीविकेची साधनं अहिल्याबाईंनी मागे ठेवून दिली आहेत. पैशाची घासाघीस करत नावाडी पाठोपाठ फिरत राहतो. कधी तरी सौदा पटतो. त्याची डोलदार रंगीत नाव पाण्यातून सरसरत जाते पलीकडच्या काठावर. या काठावरून महेश्वर नगरीला सामोरे व्हावे, पाण्यातल्या खडकावर बसून नर्मदेच्या लाटा पायावर घेत बसून राहावे. हाकेच्या अंतरावर नांगरून ठेवलेली एकुलती एक नाव. तिच्यावर झुकलेली नावाडय़ाची रेखाकृती. मावळतीचा सूर्य. अपार्थिवाचे सारे रंग पाण्यात उतरलेले. खडकांवर सांडलेले. दिवसभर अंगावर घेतलेले महेश्वरी वस्त्रांचे रंग पुन्हा एकदा देहावर उतरतात. इथे पाण्याला धार आहे. मी पाण्यात निथळत उभी राहते. ओंजळभर रंग नर्मदेला अर्पण करण्यासाठी. समोरच्या काठावर नजर जाते तर अचानक भास होतो, इथे महेश्वरला एक नाही तर दोन नद्या वाहतात. नर्मदेकाठी अहिल्या वाहत आहे आणि अहिल्येकाठी नर्मदा! हा भास की सत्य? अपार्थिवाचे रंग पाण्यावर. माझ्या देहावर. पाण्यात उमटलेल्या माझ्या प्रतिबिंबात महेश्वरी वस्त्रांचे रंग. त्यातून नर्मदा खळाळत जाते आहे. ‘आपली साडी-चोळी महेश्वरकाठी येऊन घेऊन जा.’ नवीन परिमाणाने अहिल्याबाईंचे वचन आठवते. महेश्वरी वस्त्रांचे रंग इथल्या पाण्यात रोजच उमलतात. मावळतात. हे रंग अपार्थिव आहेत.
क्षितिजापाशी सूर्य अस्ताला टेकतो आहे. या काठावरली माणसांची वर्दळ पार मावळली आहे. आता उठून जायलाच हवे पलीकडे. आकाशातील रंग मावळतात तसे पाण्यावर दिवे उमटू लागतात. वरच्या अंगाला दूर कुणीतरी पाण्यात एकापाठोपाठ एक दिवे सोडत आहे. मी दिव्यांच्या दिशेला पाहते आहे, हे लक्षात येताच नावाडी आशेने विचारतो, ‘जायचे त्या दिव्यांपाशी?’ क्षणभर मोह पडतो पण आता सगळेच रंग लोपून आभाळ काळे झाले आहे. काळ्या पाण्यावर समोरच्या महेश्वर नगरीचे दिवे हेलकावत आहेत.
निर्मनुष्य काठावरून माणसात परतायला हवे. नावाडय़ाची रंगीत नाव वाट पाहत उभी आहे. इतका वेळ मनात नसलेली भीती जागी होते. ‘सोडून गेला असता हा आपल्याला इथेच तर?’ पाण्यावरला गार वारा अंगाभोवती फिरून जातो. सोडलेल्या दिव्यांची रांग पाण्यावर उमटते आहे. पलीकडच्या काठावर गेलेली नाव पुन्हा सुखरूप महेश्वर काठी लागते. ठरल्या सौद्यापेक्षा जास्त पैसे नावाडय़ाच्या हातावर ठेवून पुन्हा एकदा महेश्वरच्या घाटावर येऊन मी विसावते. मागे किल्ल्याची शाश्वत उभी भिंत घाटावर नर्मदेची आरती, पाण्यावर दूरवर जाणारे दिवे. हनुवटी गुडघ्यावर टेकवून गुडघ्याभोवती हात गुंफून पाण्याकडे पाहताना वाटते, सोडून द्यावा आपल्याही देहाचा दिवा या पाण्यावर. शरीरात अडकून पडलेला जीव मोकळा करावा. स्त्रीत्व आहे ते या देहाला. वस्त्राचा ध्यास देहाला. या देहाच्या आतल्या जीवाला कुठला आला आहे भेद? कसला आला आहे वस्त्राचा सोस? नजर उचलून वर पाहावे तर मूक गाईंचा अश्राप कळप वडाच्या पारंब्यांखाली बसून असावा असा परिक्रमावासीयांचा एक कळप घाटावर शांतवलेला दिसतो. त्यांना ओलांडून पुन्हा गावात परतताना तीच मराठमोळ्या वाडय़ांची जुनी ओळख मनात जागी होते. वाटते, जोवर नर्मदा आहे तोवर परिक्रमावासी आहेत. जोवर सूर्य आहे तोवर पाण्यावर रंगाचे लाघव आहेत. जोवर हा घाट आहे, तोवर इथल्या नावा आहेत. जोवर इथले हातमाग आहेत, तोवर महेश्वरी साडय़ांचे कौतुक आहे. जोवर छत्र्या आहेत, तोवर पूजे-अर्चेचा पसारा आहे आणि जोवर महेश्वर आहे, तोवर इथे पुण्यश्लोक राणीचे राज्य आहे.
राणी दुर्वे
ranidurve@hotmail.com