रायगड जिल्हा

रायगड किल्ला :

६ जून १६७४ रोजी येथे शिवरायंचा राज्यभिषेक संपन्न झाला व हिंदवी स्वराज्यास खऱ्या अर्थाने एका छत्रपतीचे छत्र लाभले. तो हा रायगड किल्ला ! हा किल्ला सुमारे तीन हजार वर्षे इतका प्राचीन असावा. तथापि, त्याचा प्रथम उल्लेख येतो तो विजयनगरच्या इतिहासात !
राज्याभिषेकानंतर व तत्पूर्वीही काही काळ महारजांची राजधानी येथेच होती. या गडाचे मूळ नाव ‘रायरी’ असे होते. १६५६ मध्ये जावळी जिंकून घेतल्यानंतर चंद्रराव मोऱ्यांकडून हा गड महाराजांच्या ताब्यात आला. राजांनीच या गडाचे नाव ‘रायगड’ असे ठेवले. १६७४ नंतरच्या राजांच्या मोहीमा येथूनच आखल्या गेल्या. येथेच इ.स. १६८. मध्ये चैत्रशुद्ध पौर्णिमेस हा युगपुरुष निजधामास गेला.
महाराजांनंतर १६८९ मध्ये हा किल्ला मराठ्यांकडून मोगलांच्या ताब्यात गेला. १७३५ मध्ये मराठ्यांशी तो पुन्हा मोगलांकडून जिंकून घेतला. पेशवाईच्या पडत्या काळात याच किल्ल्याने नाना फडणीस व दुसऱ्या बाजीरावास आश्रय दिला. १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
१८६९ च्या आगेमागे महात्मा जोतिबा फुले यांनी रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला.
१८९७ मध्ये शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांनी या ऐतिहासिक वास्तूस पुन्हा उजाळा दिला.

मुख्य ठिकाण : अलिबाग तालुके : चौदा
क्षेत्रफळ : ७,१५२ चौ.कि.मी. लोकसंख्या : १८,२४,८१६

इतिहास :
इसवी सनाच्या पाचव्या-सहाव्या शतकात या प्रदेशावर मौर्यांचा अंमल होता. त्यानंतर शिलाहारांनी आपली सत्ता येथे प्रस्थापित केली. आदिलशाही, मोगल, पोर्तुगीज व हबशी यांची राजवटही या प्रदेशाने भोगली. मराठेंशाहीचे कर्तृत्वही या जिल्ह्याने पाहीले-जोपासले. इंग्रजांचे वर्चस्वही सोसले-सहन केल.
रायगड जिल्ह्याचे नाव पूर्वी ‘कुलाबा’ असे होते. छत्रपती शिवरायांची राजधानी जो रायगड किल्ला, तो याच जिल्ह्यात असल्याने १ जानेवारी १९८१ रोजी कुलाबा जिल्ह्याचे नामांतर ‘रायगड’ असे करण्यात आले. रायगड जिल्ह्याचे मराठ्यांच्या इतिहासाशी असलेले नाते अतूट आहे. शिवरायांचा उजवा हात असलेले तानाजी मालुसरे याच जिल्ह्यातील उमरठ गावचे. दिल्लीच्या बादशहाकडून चौथाई वसूल करण्याचा व अटकेपार झेंडे रोवणाऱ्या पेशव्यांचे घराणे मूळचे याच जिल्ह्यातील श्रीवर्धनचे! मराठेशाहीच्या सागरी वर्चस्वाची भिस्त ज्या आंग्र्याच्या आरमारावर अवलंबून असे, ते आंग्रेही याच जिल्ह्यातील !

स्थान :

राज्याच्या पश्चिम भागातील कोकण विभागातील जिल्हा. जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र पसरलेला असून पूर्वेस सह्याद्री व त्याला लागून पुणे जिल्हा पसरलेला आहे. या जिल्ह्याच्या दक्षिणेस रत्नागिरी जिल्हा असून आग्नेयेस सातारा जिल्हा आहे. ठाणे जिल्हा या जिल्ह्याच्या उत्तरेस पसरलेला आहे. जिल्ह्याच्या नैसर्गिक सीमा द्यावयाच्या झाल्यास जिल्ह्याची पश्चिम सीमा अरबी समुद्राने निश्चित केल्याचे, पूर्व सीमा सह्य पर्वतरांगांनी सीमित केल्याचे, तर दक्षिण सीमेचा काही भाग बाणकोटची खाडी व काही भाग सह्याद्रीच्या रांगा यांनी सीमित केल्याचे सांगता येईल. उत्तरेकाडे या जिल्ह्यास नैसर्गिक सीमा नाही. जिल्ह्याचा दक्षिण-उत्तर विस्तार सुमारे १६० कि.मी. असून पूर्व-पश्चिम विस्तार २५ ते५० कि.मी. इतका आहे. या जिल्ह्यास एकूण २४० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला असून किनाऱ्यालगत खांदेरी-उंदेरी, घारापुरी, करंजा, कासा, कुलाबा, जंजिरा अशी अनेक लहान-मोठी बेटे आहेत. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी २.३२ टक्के क्षेत्र या जिल्ह्याच्या वाट्यास आले आहे.

तालुके :

(१) अलिबाग (२) उरण (३) पनवेल (४) कर्जत (५) खालापूर (६) पेण (७) सुधागड (पाली) (८) रोहा (९) माणगाव (१०)महाड (११) पोलादपूर (१२) म्हसळे (१३) श्रीवर्धन (१४) मुरुड. एकूण तालुके चौदा.

प्राकृतिक रचना :

रायगड जिल्ह्यात विविध प्रकारची भू-रूपे आढळतात. जिल्ह्याच्या पूर्व सीमाप्रदेशालगत सह्याद्री पर्वत उत्तर-दक्षिण पसरलेला असून या सह्याद्रीच्या रांगा ओलांडून जिल्ह्यापलीकडे जावयाचे झाल्यास भिमाशंकर, सावळा, कुसूर, बोर, लिंगा, कुंभा, कवळ्या, शेवत्या, वरंधा, ढवळा व पार यांसारखे घात ओलांडावे लागतात. पूर्वेकडे उत्तर-दक्षिण पसरलेल्या या सह्य पर्वतरांगाच्या माथेरान, मलंगगड, चंदेरी, कनकेश्वर, सुकेल, धूप, मिऱ्या, कुंभी यांसारख्या शाखा-उपशाखा थेट किनारी भागापर्यंत पोहोचल्या आहेत. अर्थात, किनारी भागातील त्यांची उंची समुद्रसपाटीपासून १५० मीटर पेक्षाही कमी आहे. जिल्ह्याच्या मध्य भागात या डोंगररांगांची उंची २०० मीटरपर्यंत तर पूर्व भागात ६०० मीटरहून अधिक आहे. काही भाग १,००० मीटरपेक्षानी उंचावर आहे.
पूर्वेकडील सह्य पर्वतरांगांचा प्रदेश; किनाऱ्यालगतचा खालाटीचा प्रदेश व पूर्वेकडील डोंगराळ भाग यांच्या मधील मैदानी व सखल भाग आणि किनाऱ्यालगतचा खालाटीचा

जिल्ह्यात ‘आगरी’ या जातीचे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. या जातीचा समावेश महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या इतर मागास जातींमध्ये होतो.

प्रदेश अशी जिल्ह्याची सर्वसाधारण स्वभाविक रचना आहे. पूर्वेकडील सह्याद्री रांगांच्या डोंगराळ प्रदेशात कर्जत, खालापूर, सुधागड, माणगाव, महाड व पोलादपूर या तालुक्याचा पूर्व भाग समाविष्ट होतो. पनवेल, पेण, रोहे, माणगाव, म्हसळे व महाड या तालुक्याचा बराचसा भाग जिल्ह्यांच्या मध्य भागातील सखल व मैदानी प्रदेशात मोडतो. अनेक नद्यांच्या छोट्या-मोठ्या खोऱ्यांनी हा सखल व मैदानी भाग सुपीक बनला आहे. उरण, अलिबाग, मुरुड व श्रीवर्धन या तालुक्यांचा बव्हंशी भाग किनारी प्रदेशात किंवा खालाटीत येतो.
पूर्वेकडील सह्याद्रीच्या उंच व डोंगराळ भागात तुंगी (तालुका कर्जत); कोटलिगड (तालुका कर्जत); ढोक (तालुका कर्जत); सुधागड (तालुका सुधागड); सरसगड (तालुका सुधागड); मानगड (तालुका महाड); सोनगड (तालुका महाड); रायगड (तालुका महाड); चंद्रगड (तालुका पोलादपूर); लिंगाणा (तालुका महाड); यांसारखे डोंगरी किल्ले आहेत.
जिल्ह्याच्या मध्य भागापासून जे काही सह्याद्रीचे फाटे-उपफाटे गेलेले आहेत, त्यांवरही मलंगगड व कर्नाळा (तालुका पनवेल), अवचितगड, सूरगड व धोसालगड (सर्व तालुका रोहे); रतनगड आदी डोंगरी किल्ले आहेत.
पश्चिमेकडील किनारी भागात अनेक निसर्गरम्य पुळणी असून पनवेलची खाडी, धरमतरची खाडी, रोह्याची खाडी व राजापूरची खाडी अशा खाड्या आहेत. बाणकोटच्या खाडीने काही अंतरापर्यंत या जिल्ह्याची दक्षिण सीमा सीमित केली आहे. खांदेरी-उंदेरी व कुलाबा (सर्व तालुका अलिबाग); कोर्ल‍ई व जंजिरा (तालुका मुरुड) हे जलगुर्ग या किनारी भागालगत असून हिराकोट (अलिबाग) व आगरकोट (रेवदंडा) यांसारखे भुईकोट किल्लेही या भागात आहेत.

मृदा :

जिल्ह्याच्या मध्य भागातील सखल मैदानी प्रदेशात गाळाची व सुपीत मृदा असून किनारी भागात रेती व वाळूमिश्रित मृदा आहे. जिल्ह्याच्या पूर्वेकडील डोंगराल भागात ‘लॅटराईट’ प्रकारची माती आढळते.

हवामान :

जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणतः सम, उष्ण व दमट आहे. दिवसांच्या व रात्रीच्या तापमानात फारसा फरक नसतो. उन्हाळे खूप उष्ण नसतात व हिवाळेही खूप थंड नसतात. मात्र, सर्वच ऋतूत हवेतील आर्द्रता जाणवण्याजोगी असते. जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून सरासरी ५० से.मी. इतका पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढत जाते. जिल्ह्यात माथेरान येथे सर्वाधिक पाऊस पडतो, तर अलिबाग येथे किमान पावसाची नोंद होते.

‘माझा प्रवास’ हे मराठीतील पहिले प्रवासवर्णन लिहिणारे गोडसे भटजी याच जिल्ह्यातील ‘वरसई गावचे ! महात्मा गांधीजीच्या वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही, महात्मा गांधीजींचे कट्टर अनुयायी व समश्लोकी गीतेचे (गीताई) कर्ते विनोबा भावेही याच जिल्ह्यातील, गागोदे (पेण) येथील!

नद्या :

उल्हास, प्राताळगंगा, भोगावती, अंबा, कुंडलिका, काळ व सावित्री या जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत. या सर्व नद्या पूर्वेकडील सह्य डोंगररांगांत उगम पावून वलणे घेत घेत पश्चिमेकडे वाहात जाऊन अरबी समुद्रास मिळतात.
उल्हास नदी बोरघाटाच्या उत्तरेस सह्याद्री रांगाम्त उगम पावते व कर्जत तालुक्यातून दक्षिण-उत्तर वाहात जाऊन पुढे ठाणे तालुक्यात प्रवेशते. पाताळगंगा नदीचा उगम बोरघाटाजवळ होतो, तर भोगावतीचा उगम बोरघाटाच्या दक्षिणेस होतो. या दोन्ही नद्या पश्चिमेकडे वाहात जाऊन धरमरतच्या खाडीत अरबी समुद्रास मिळतात, किंबहुना यांच्या मुखाशी धरमतरची खाडी तयार झाली आहे, असेही म्हणता येईल. पाताळगंगेचा जिल्ह्यातील प्रवास खालापूर, पनवेल व पेण या तालुक्यांमधून होतो. ‘खालापूर’ हे ठिकाण पाताळगंगेच्या काठी वसले आहे. अंबा नदी प्रथम नैऋत्य दिशेकडे व नंतर वायव्येकडे वाहात जाऊन पुढे धरमतरच्या खाडीत अरबी समुद्रास मिळते. अंबा नदीचा जिल्ह्यातील प्रवास प्रथम सुधागड तालुक्यातून व नंतर पेण तालुक्यातून होतो. पाली हे सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण अंबा नदीकाठी वसले आहे. सुधागड जवळच्या डोंगराळ प्रदेशात उगम पावणारी कुंडलिका सुधागड व रोहे या तालुक्यामधून पूर्व-पश्चिम प्रवास करते हिच्या मुखाशी रोह्याची खाडी आहे.
सावित्री नदी प्रथम पोलादपूर व नंत्र महाड तालुक्यातून वाहाते. तिचा पुढील प्रवास प्रथम म्हसळे तालुक्याच्या दक्षिणेस सीमेवरून व पुढे काही अंतर श्रीवर्धन तालुक्याच्या दक्षिण सीमेवरून होतो. हा प्रवास करीत असताना तिने काही अंतर रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांच्या नैसर्गिक सीमेचे कार्य केले आहे. हिच्या मुखाशी बाणकोटची खाडी आहे. घोड व काळ या सावित्रीच्या उपनद्या असून त्या महाड तालुक्यात सावित्रीस मिळतात. माडगाव हे स्थळ घोडनदीच्या काठावर वसले आहे. जिल्ह्यात भिरा (तालुका माणगाव), भिवपुरी (तालुका कर्जत) व खोपोली येथे विद्युतनिर्मिती केंद्रे आहेत. कर्जत तालुक्यातील भिवपुरी विद्युतनिर्मिती केंद्रातून सोडलेले पाणी (अवजल) अडवून त्याच तालुक्यात ‘राजनाला’ हे धरण बांधण्यात आले आहे. खालापूर तालुक्यातील खोपोली जलविद्युत केंद्रातील पाणी (अवजल) पाताळगंगा नदीत सोडून या नदीवर ‘पाताळगंगा’ प्रकल्पां’तर्गत धरण बांधण्यात आले आहे. माणगाव तालुक्यातील भिरा विद्युत केंद्रातील पाणी कुंडलिका नदीत सोडून त्यावर कोलाडजवळ ‘काळ प्रकल्पां’तर्गत धरण बांधण्यात आले आहे.

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेही याच जिल्ह्यातील शिरढोणचे ! शिरढोण येथे १८४५ मध्ये त्यांचा जन्म झाला.

पिके :

भात हे रायगड जिल्ह्यातील प्रमुख पीक असून जिल्ह्यात लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी जवळजवळ सत्तर टक्के क्षेत्र भात पिकाखाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र भाताचे उत्पादन घेतले जात असले, तरी माणगाव, अलिबाग, पनवेल, व पेण हे तालुके भाताच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पोलादपूर, महाड, माणगाव व रोहे या तालुक्यांमध्ये नाचणी व वरीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. वरील पिकांशिवाय खरीप हंगामात वाल व तूर यांसारखी पिकेही घेतली जातात. माड किंवा नारळाची लागवड जिल्ह्याच्या किनारी भागातील रेताड व खाऱ्या जमिनीत केली जाते. अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड व म्हसळे या तालुक्यांत माडाच्या बागा मोठ्या प्रमाणावर असून हे तालुके नारळाच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. पोफळीची किंवा सुपारीची आगरे श्रीवर्धन, पनवेल, अलिबाग, खालापूर व पेण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. श्रीवर्धन येथील रोठा जातीची सुपारी प्रसिद्ध आहे.
जिल्ह्यातील डोंगर उतारावरील तांबड्या मृदेत आंब्याची लागवड केली जाते. रातांबीचे झाड थोड्या कमी प्रतीच्या जमिनीतही येते. त्यामुळे अशा प्रकारच्या जमिनीत रातांबीची झाडे लावली जातात. रातांबीच्या फळांना ‘कोकम’ असे म्हणतात. कोकमपासून आमसुले तसेच सरबत तयार केले जाते.
याशिवाय जिल्ह्यात काजू, कलिंगड, फणा आदी फळांचे उत्पानही कमी-अधिक प्रमाणावर घेतले जाते.

वने :

जिल्ह्यातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या जवळजवळ एक चतुर्थांश क्षेत्रावर वने आहेत. पेण, पनवेल, कर्जत, रोहे आणि सुधागड या तालुक्यांमध्ये वनाचे प्रमाण अधिक आहे. या वनांमध्ये साग, ऐन, खैर, आंबा, चिंच यासारखे वृक्ष आहेत. येथील वनांमध्ये वाघ, कोल्ह्ये, रानडुक्कर, सांबर यांसारखे प्राणी आढळतात. पनवेल तालुक्यात कर्नाळा येथे पक्ष्यांसाठी राखीव असलेले अभयारण्य आहे. उरण तालुक्यात घारापुरी व कर्जत तालुक्यात माथेरान येथे वनोद्याने आहेत. जिल्ह्यातील फणसाड येथील अभयारण्य अतिशय विस्तृत क्षेत्रावर पसरलेले आहे.

खोपोली येथील जलविद्युत निर्मिती केंद्र राज्यातील पहिले जलविद्युत निर्मितीकेंद्र म्हणून ओळखले जाते.

खनिजे :

बॉक्साईट हे खनिज श्रीवर्धन, रोहे व मुरुड या तालुक्यात काही प्रमाणात सापडते. जिल्ह्यात काही ठिकाणी लोह लोह खनिजाचेही तुरळक साठे आढळतात. उरनजवळ समुद्रात खनिज तेलाचे साठे आहेत. उरण, पेण व पनवेल या तालुक्यांमध्ये किनारी भागात मोठ्या प्रमाणावर मिठागरे आहेत.

सागर संपत्ती :

जिल्ह्याला सुमारे २४० कि.मी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. साहजिकच मत्स्यव्यवसाय हा जिल्ह्यातील एक प्रमुख व्यवसाय आहे. जिल्ह्यात खाऱ्या पाण्यातील सुरमई, बांगडा, हाईद, कर्ली, रावस, सरंगा, पापलेट, पेडवे, रेण्व्या इत्यादी प्रकारच्या माशांची पकड मोठ्या प्रमाणावर होते. खाजणांमध्ये कोळंबीची शेतीही केली जाते. काही ठिकाणी थोड्या-फार प्रमाणात गोड्या पाण्यातील मासेमारीही केली जाते. अलीकडील काळात मासेमारीसाठी यांत्रिक नौकांचा वापर व प्रगत तंत्रज्ञांनाचा अवलंब मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.

उद्योगधंदे :

खोपोली, पनवेल, रोहे, अलिबाग, तळोजे, पाताळगंगा, नागोठणे व महाड इत्यादी ठिकाणी औद्योगिक वसाहती असून जिल्हा औद्योगिकदृष्ट्या विकसित होत आहे.
थळ-वायशेत येथे राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर्स हा सार्वजनिक क्षेत्रातील खत-प्रकल्प कार्यरत आहे. येथे सुफला व उज्ज्वला ही खते तयाअ होतात. पनवेलजवळ ‘रासायनी’ नावाने ओळखला जाणारा हिन्दुस्थान ऑरगॅनिक केमिकल्सचा सार्वजनिक क्षेत्रातील औषध-निर्मिती प्रकल्प असून येथे मोठ्या प्रमाणावर अ‍ॅन्टिबायोटिक्सची निर्मिती केली जाते. पनवेल शहरात धूत-पापेश्वर कंपनीचा आयुर्वेदिक औषधांचा कारखाना आहे.
नागोठणे येथे इंडियन पेट्रो-केमिकल्सचा प्रकल्प असून उरण व बॉम्बे-हायमधून उपलब्ध झालेल्या खनिज तेलापासून इथेन व प्रोपेन या वायूंवर प्रक्रिया करून इथिलिन मिळविले जाते. हा वायूविभाजन प्रकल्प नुकताच खाजगी क्षेत्राकडे सोपविला गेला आहे.
महाड येथे हातकागद तयार करण्याचा उद्योग असून रोहे व खोपोली येथे पुठ्ठे तयाअ करण्याचा व्यवसाय चालतो. खोपोली येथे एक कागद गिरणीही आहे. रोहे, महाड व पाली येथे तांब्या-पितळीची भांडी तयार करण्याचा उद्योग असून महाड, पोयनाड, पाली व खालापूर येथे मातीची भांडी व विटा तयार करण्याचा उद्योग आहे. पेण येथे शाडूच्या मूर्ती तयाअ करण्याचा परंपरागत व्यवसाय असून येथे तयार होणाऱ्या गणपतीच्या मूर्ती प्रसिद्ध आहेत.

रायगड किल्ला सरस्वती नदीकाठी पाचाड येथे वसला आहे. याच किल्ल्यावर ६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक समारंभ संपन्न झाला. या अभेद्य व दुर्गम किल्ल्याच्या रचनेचे श्रेय हिरोजी इंदलकर यांना दिले जाते. एक प्रकारे ते या किल्ल्याचे वास्तुरचनाकार होत.

प्रमुख स्थळे :

अलिबाग : समुद्रकिनारी वसलेले हे शहर रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. शहराच्या नैऋत्येस दोनशे मीटर अंतरावर एका छोट्या बेटावर कुलाब्याचा इतिहास-प्रसिद्ध किल्ला आहे. हा जिल्हा पूर्वी याच किल्ल्याच्या नावाने ओळखला जात होता. येथे मायनाक भंडारी याशिवाजीच्या आरमार प्रमुखाचे मुख्य ठाणे होते. हा किल्ला भक्कम असल्याने पुढे मराठी आरमाराचे सरखेल आंग्रे यांनीही आपले मुख्य ठाणे येथेच वसविले. आंग्रे घराण्यातील पराक्रमी व कर्तबगार पुरुष सरखेल कान्होजी आंग्रे यांचे स्मारक अलिबाग येथे आहे. गावातील हिराकोट हा भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. खांदेरी व उंदेरी हे जलदुर्गही अलिबागपासून जवळच आहेत. खांदेरीच्या किल्ल्यावर दीपगृह आहे. जवळच असलेल्या ‘चोल’ या ठिकाणी बौद्धकालीन लेणी आहेत.
येथे १८४१ मध्ये एक भू-भौतिकीय वेधशाळा स्थापन करण्यात आली आहे. १९०४ पासून कार्यरत असलेल्या या वेधशाळेस आतरराष्ट्रीय महत्त्व आहे.

घारापुरी : घारापुरी हे ठिकाण मुंबईपासून जवळ परंतु रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यात आहे. हे किनाऱ्यापासून जवळ असलेले एक बेट असून, येथील गुंफांमध्ये प्राचीन लेणी आहेत. या गुंफा ‘एलेफंटा केव्ह्‌ज’ म्हणुनही ओळखल्या जातात. घारापुरी येथे वनोद्यानही आहे.

श्रीहरिहरेश्वर : हे श्रीवर्धन तालुक्यात असून येथील शिवमंदिर प्रसिद्ध आहे. निसर्गरम्य सागरकिनारा व पुळण यांमुळे हे स्थळ पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

मुरुड-जंजिरा : जंजिरा हा अभेद्य असा जलदुर्ग मुरुडजवळ सागरात वसलेले आहे. सिद्दींच्या ताब्यात असलेला हा जलदुर्ग मराठ्यांना अखेरपर्यंत जिंकता आला नाही.

रेवदंडा : रोह्याच्या खाडीच्या तोंडाशी असलेले हे बंदर अलिबाग तालुक्यात आहे. येथे ‘आगरकोट’ हा भुईकोट किल्ला आहे.

कोर्लई : हे स्थळ रोह्याच्या खाडीच्या तोंडाशी मुरुड तालुक्यात आहे. हे ठिकाण रेवदंडा बंदराच्या नेमदे समोर असून येथील किल्ल्यावर दीपगृह आहे.

शिवथरघळ : महाड तालुक्यात वरंधा घाटाजवळ. येथे समर्थ रामदासांनी आपला ‘दासबोध’ हा ग्रंथ लिहिला, असे म्हटले जाते.

माथेरान : सह्यपर्वतावरील हे थंड हवेचे ठिकाण कर्जत तालुक्यात आहे. नेरळहून नेरळ-माथेरान या अरुंदमापी रेल्वेने माथेरानला जाता येते. दाट वने, रमणीय परिसर आणि थंड व आल्हाददायक हवा यांमुळे हे स्थळ पर्यटकांचे आकर्षणकेंद्र बनले आहे.

या जिल्ह्यातील ‘कातकरी’ ही आदिवासी जमात केंद्रशासनाने ‘अतिमागास’ म्हणून घोषित केली आहे.

महाड : महाड तालुक्याचे मुख्य ठिकाण. हे पनवेल-मंगलोर (मुंबई-गोवा) या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरावरील प्रमुख ठिकाण आहे. येथील तळे अस्पृश्यांना खुले व्हावे, म्हणून २० मार्च १९२७ रोजी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह ‘चवदार तळ्याचा सत्याग्रह” म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. एकेकाळी हे गाव ‘महिकावती’ या नावाने ओळखले जात होते.

रायगड किल्ला : महाड तालुक्यात महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. अंतरावर व जंजिऱ्याच्या पूर्वेस ६४ कि.मी. अंतरावर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सुमारे ८४६ मीटर उंचीवर हा किल्ला वसला आहे. शिवरायांची राजधानी म्हणून हा गड प्रसिद्ध आहे. येथे शिवरायांची समाधी आहे.

कर्नाळा : पनवेल तालुक्यात पनवेल-मंगलोर महामार्गावर पनवेलपासून १० कि.मी. अंतरावर कर्नाळा किल्ला वसला आहे. ५०० मीटरहून अधिक उंचीवरील हा किल्ला पर्यटकांचे व विशेषतः गिर्यारोहकांचे आकर्षण आहे. येथे पक्ष्यांसाठी राखीव असलेले अभयारण्यही आहे.

पाली : सुधागड तालुक्याचे मुख्य ठिकाण. येथील बल्लाळेश्वर अष्टविनायकांपैकी एक मानला जातो.

मढ : खालापूर तालुक्यात पुणे-मुंबई रस्त्यावर खोपोलीपासून सात कि.मी. अंतरावर. येथील श्रीविनायकाचे स्थान अष्टविनायकापैकी एक गणले जाते.
याशिवाय राजपुरी (मुरुड तालुक्यातील एक बंदर); उरण (तालुक्याचे मुख्य ठिकाण व मिठागरे.); खालापूर (तालुक्याचे मुख्य ठिकाण.)); मांडवे व रेवस (अलिबाग तालुक्यातील बंदरे.); गागोदे (पेण तालुक्यात. आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान.) ही जिल्ह्यातील महत्त्वाची अन्य स्थळे होत.

वाहतूक :

पनवेल-मंगळूर (गोवामार्गे) हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा व मुंबई-चेन्नई (पुणे-बंगळूरमार्गे) हा राष्ट्रीय महामार्ग चार हे दोन राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातात. पेण, नागोठाणे, माणगाव, महाड व पोलादपूर ही पनवेल-मंगळूर या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानके होत, तर पनवेल, चौक व खोपोली ही मुंबई-चेन्नई या महामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे होत.
मुंबई-पुणे हा जिल्ह्यातून जाणारा महत्त्वाचा लोहमार्ग होय. नेरळ, भिवपुरीरोड, कर्जत व पळसदरी ही या लोहमार्गावरील जिल्ह्यातील स्थानके होत.

जिल्ह्यात लोणेरे येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ’ स्थापन झाले आहे.