कुळकथा चैत्यभूमीची…

कुळकथा चैत्यभूमीची…

बाबासाहेबांना मानणाऱ्या दलितांसह विविध जाती-धर्माचे लोकही महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीला हजेरी लावतात. पाच तारखेच्या सकाळपासून दादरचे रस्ते गजबजू लागतात ते थेट ६ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत तसेच वातावरण असते.

६ डिसेंबरची चाहुल लागताच भारतरत्न, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीला एकवटतात. सगळ्यांनाच काही चैत्यभूमीच्या मुख्य वास्तूत जाणे शक्य होत नाही, ते लांबूनच मनोमन त्या वास्तूचे दर्शन घेतात. अनेक वर्षापासून हे चालू आहे. यासाठी कोणी आवाहन करत नाही. अभिवादनाचा सांगावाही पाठवत नाही. पण बाबासाहेबांना मानणाऱ्या दलितांसह विविध जाती-धर्माचे लोकही महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीला हजेरी लावतात. पाच तारखेच्या सकाळपासून दादरचे रस्ते गजबजू लागतात ते थेट ६ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत तसेच वातावरण असते.

६ डिसेंबरच्या निमित्ताने आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीला येतात, पण ही वास्तू आणि तो परिसर कसा मिळाला याचाही इतिहास आहे. ६ डिसेंबरला बाबासाहेबांचे निधन झाल्यावर माईसाहेब आंबेडकर पूर्वाश्रमीच्या सविता कबीर यांनी याबाबतची माहिती तर्कतीर्थ सोहनलाल शास्त्री यांना दिली. (हे शास्त्री बाबासाहेबांना संस्कृतसाठी मदत करायचे. त्यांनी बाबासाहेबांविषयीच्या आठवणींचे पुस्तकही लिहिलेले आहे) शास्त्री यांनी तत्कालीन जवाहरलाल नेहरू मंत्रिमंडळातील मंत्री बाबू जगजीवनराम यांच्या कानावर बाबासाहेब निवर्तल्याची दु:खद बातमी घातली. माईसाहेबांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. पण पुरेसे पैसे नसल्याने मोठीच समस्या होती. आता अंत्यसंस्कारचा खर्च कोण उचलणार हा मुद्दा आल्यावर त्याकाळी बाबू जगजीवनराम यांनी पाच लाख रु.ची मदत केली. त्यानंतर दिल्लीत ट्रकवर बाबासाहेबांचे पार्थिव ठेवून ते अनुयायांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ते विमानाने मुंबईच्या दिशेने आणण्यात आले. बाबासाहेबांचे ७ डिसेंबरला दादरला अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजल्यावर चांद्यापासून बांद्यापर्यंतचे त्यांचे अनुयायी मिळेल त्या वाहनाने मुंबई गाठत होते.

दरम्यानच्या काळात बाबासाहेबांचे पुत्र यशवंतराव आंबेडकर, सहकारी दादासाहेब गायकवाड, अ‍ॅड. बी. सी. कांबळे (यांनी बाबासाहेब घटनेचे ड्राफ्ट तयार करताना मदत केली होती. ते ज्येष्ठ विधिज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होते. बाबासाहेबांच्या निधनानंतर रिपब्लिकन पार्टीत फूट पडली. त्यातील एका पार्टीचे ते अध्यक्ष होते. त्या दोन पक्षांना, गटांना अनुक्रमे दुरूस्त, नादुरूस्त असे नावेही पडली होती, त्यातील नादुरूस्त गटाचे प्रतिनिधीत्व हे बापू कांबळे करायचे) यांनी सल्लामसलत करून अंत्यसंस्कार समुद्राच्या साक्षीने करायचे ठरवले. पण समुद्राजवळील जागेवर अंत्यसंस्कारास तेव्हाच्या मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी हरकत घेतली. सध्याच्या चैत्यभूमी परिसरात त्यावेळी बऱ्याच जणांच्या खासगी जागा होत्या. अंत्यसंस्कारासाठी जागा काही मिळत नव्हती, तेव्हा बाबासाहेबांच्या चळवळीतील अग्रणी, भंडारी समाजाचे विधानसभेचे आमदार सी. के. बोले यांनी आपल्या जागेची कागदपत्रे पालिकेस सादर करून अंत्यसंस्कारासाठीच्या जागेची समस्या सोडवली. अंत्यसंस्कारापूर्वी लाख अस्पृश्यांनी बाबासाहेबांच्या चितेच्या साक्षीने धर्मांतर केले. त्यानंतर चितेला अग्नी दिला.

८ डिसेंबरला राख सावडणीच्या दिवशी यशवंतराव आंबेडकर यांनी चितेला अग्नी दिलेल्या जागेवर वास्तू उभारून बाबासाहेबांची स्मृती जिवंत ठेवण्याचा संकल्प केला. त्याला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. नंतर एक संस्था स्थापून निधी गोळा करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. पण त्यात घोळ होत असल्याच्या बातम्या यशवंतरावांच्या कानावर आल्यावर त्यांनी एकट्याने निधी संकलनासाठी भारतभ्रमण करण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्याकाळी एक रथ तयार करण्यात आला. त्या रथावरून ते देशभर फिरले. एक वास्तू बांधण्याएवढा निधी गोळा झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी चैत्यभूमी परिसरात वास्तू बांधण्याचे ठरवले. त्यानुसार एक वास्तू बांधून बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून या वास्तूत ठेवलेल्या बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर एकवटतात.

कोट्यवधींची ग्रंथविक्री

६ डिसेंबरच्या सकाळपासून चैत्यभूमी परिसरात ग्रंथ, गाण्यांच्या कॅसेटस तसेच अन्य स्टॉलची उभारणी करण्यात येते. यात अनेकांचे पावले वळतात ते ग्रंथांच्या स्टॉलकडे. देशातील तसेच राज्यातील पुस्तक प्रकाशन संस्थांचे स्टॉल येथे हारीने असतात. विविध विषयांवरील बाबासाहेबांचे लेखन यापासून बाबासाहेबांसह अन्य महापुरूषांवरील अनेक सरस, अभ्यासपूर्ण ग्रंथ येथे कमी किमतीत उपलब्ध होतात. खेड्यातून आलेला एखादा ग्रामस्थ दादरला आल्यावर एकवेळ पोटात अन्नाचा कणही टाकणार नाही. पण आपल्याकडच्या कनवटीला लावलेले पैसे काढून खास मुलासाठी, नातवासाठी बाबासाहेबांचा ग्रंथ खरेदी करत असल्याचे चित्र दरवर्षी पाहावयास मिळते. चैत्यभूमीवर दोन दिवसात कोट्यवधींची ग्रंथविक्री होते.

ऊर्जास्रोत

दरवर्षी दलितांमधील विचारवंत, विद्वान, उद्योगपती, श्रीमंत हे चैत्यभूमीला भेट देतात. येथे आल्यावर एक ऊर्जा प्राप्त होत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. येथे आल्यावर आपल्यातील अहं गळून पडतो. बाबासाहेबांच्या कार्याची उंची पाहिल्यावर आपण किती खुजे आहोत, याची जाणीव होते. त्यामुळे प्रत्येकाने महापरिनिर्वाणदिनी फक्त काही तास चैत्यभूमी परिसरात चक्कर मारावी, रेंगाळावे असे अनेकांचे मत आहे.

लिटील मॅगझिनवाल्यांचे कवीसंमेलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मराठीत नामदेव ढसाळ, ज.वि. पवार, प्रज्ञा पवार यांनी कविता लिहिलेल्या आहेत. त्यातून चैत्यभूमी परिसर आणि बाबासाहेबांचे कर्तृत्व अधोरेखित झालेले आहे. पण चैत्यभूमीवर लिटील मॅगझिनवाल्याचे कवीसंमेलनही झाले असल्याची आठवण ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार यांनी सांगितली आहे. १९८०-८१ च्या ६ डिसेंबरला सदानंद रेगे, नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, ज. वि. पवार, अशोक बागवे आदी कवी या संमेलनात सहभागी झाल्याची आठवणही पवार यांनी सांगितली.

लेखक पत्रकार आहेत.

COMMENTS